पिंपरी (Pclive7.com):- वास्तुकला म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि स्टीलची मांडणी नसून, ती मानवी वर्तन, विचार आणि भावनांवर होणारा खोलवर परिणाम आहे. आजच्या तरुण पिढीने जागतिक डिझाइन्सची आंधळी नक्कल करण्यापेक्षा भारतीय संस्कृती, हवामान आणि मानवी संवेदनशीलता यांचा विचार करून भविष्यातील भारताचा पाया रचावा. तुमचे डिझाइन केवळ इन्स्टाग्रामवर दिसण्यासाठी नको, तर ते इतिहासात नोंदवले जाईल अशा गुणवत्तेचे असावे, असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित ‘Elevation 2026’ या उपक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद आणि मोठ्या संख्येने भावी आर्किटेक्ट्स व इंटीरियर डिझाइनर्स उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार गोरखे म्हणाले की, देशाची प्रगती केवळ जीडीपी (GDP) सारख्या आकड्यांमधून दिसत नाही, ती अनुभवातून दिसते. देशाची ओळख वास्तूंमधून होते. ताजमहाल, संसद भवन किंवा अजिंठा-वेरूळची लेणी आजही आपल्याशी संवाद साधतात. आपल्या पूर्वजांनी वास्तुकलेला केवळ व्यवसाय न मानता ‘धर्मा’सारखे पवित्र मानले. त्यांनी निसर्गाशी झुंज दिली नाही, तर निसर्गाशी संवाद साधला. हेच तत्वज्ञान आजच्या आधुनिक वास्तुविशारदांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
शॉर्ट-कट आर्किटेक्चर..
सध्याच्या परिस्थितीवर बोलताना आमदार गोरखे यांनी नमूद केले की, बजेट आणि वेळेच्या कमतरतेमुळे होणारे ‘शॉर्ट-कट आर्किटेक्चर’ दीर्घकालीन समस्या निर्माण करते. आपल्याला केवळ ‘स्मार्ट सिटीज’ नको आहेत, तर माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या ‘सेन्सेटिव्ह सिटीज’ हव्यात. बी. व्ही. दोशी आणि चार्ल्स कोरिया यांनी घालून दिलेल्या आदर्शांप्रमाणे गरिबांनाही वास्तूतून प्रतिष्ठा मिळायला हवी.

भारतीय जीवनशैलीचा आदर..
इंटीरियर डिझाइन म्हणजे वास्तूचा आत्मा इंटीरियर डिझाइनच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, आर्किटेक्ट इमारतीचे शरीर उभे करतो, तर इंटीरियर डिझाइनर त्यात ‘आत्मा’ फुंकतो. प्रकाश, ध्वनी, स्पर्श आणि रंगांचे संतुलन म्हणजे खरे डिझाइन. एक शाळा मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करू शकते किंवा एक हॉस्पिटल रुग्णाला आशा देऊ शकते; ही किमया तुमच्या हातात आहे. विदेशी मॅगझिनची नक्कल करण्यापेक्षा भारतीय जीवनशैलीचा आदर करणारे डिझाइन्स तयार करा.
विकसित भारताचा पाया तुमच्या हातात..!
२०४७ चा समृद्ध भारत भाषणांनी मोठा होणार नाही, तर तो भक्कम ‘फाऊंडेशन’वर उभा राहील. या भविष्याचा पाया रचण्याची जबाबदारी माझ्या समोर बसलेल्या तरुण पिढीची आहे. तुम्ही केवळ इमारती उभारणार नाही, तर भारताची समृद्ध संस्कृती उभारणार आहात, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
Tags: Amit Gorkhe





















Join Our Whatsapp Group