पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून नागरिकांना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

चिंचवड स्टेशन ते पिंपरी पेट्रोल पंप या मार्गावर परिस्थिती अधिक गंभीर आहे. या मार्गावर ना वाहतूक पोलीस दिसतात, ना योग्य दिशादर्शक फलक. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष दीपक भोजणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसेच महापौर रवी लांडगे यांना निवेदन देऊन संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

महामेट्रोचे काम सुरू असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



















Join Our Whatsapp Group