आळंदी (Pclive7.com):- विजया एकादशीच्या पावन निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला रंगीबेरंगी आणि आकर्षक फुलांची देखणी सजावट करण्यात आली आहे. देशी-विदेशी विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून भाविकांचे लक्ष वेधून घेणारे मनोहारी रूप साकारले आहे.

झेंडू, अष्टर, गोंडा, राजा आदी फुलांसह विविध रंगांच्या फुलांचा वापर करून समाधी मंदिरात नयनरम्य सजावट करण्यात आली. माऊलींच्या मुखवट्याला नवीन वस्त्र परिधान करून फुलांची विशेष आरास करण्यात आली असून मुखवट्याचे तेजस्वी आणि प्रसन्न रूप भाविकांना भावत आहे.

सकाळपासूनच हे मनोहारी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आळंदी नगरीत मोठी गर्दी केली. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. विजया एकादशीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि अभिषेक यांचेही आयोजन करण्यात आले आहे. या आकर्षक फुलसजावटीमुळे आळंदीतील वातावरण भक्तिमय झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


















Join Our Whatsapp Group