पिंपरी (Pclive7.com):- लिफ्टचा वापर करताना लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात आला आहे. एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत काही महिन्यांच्या चिमुकलीचा हात अडकला. सुदैवाने, नागरिकांच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच तिचा हात बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेचा थरारक प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिघी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत ही घटना घडली. एक महिला आपल्या काही महिन्यांच्या चिमुकलीसह लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि काही क्षणांत पुन्हा बंद होऊ लागला. त्याचवेळी चिमुकलीने सहजपणे आपला हात दरवाजावर ठेवला होता. दरवाजा बंद होताना तिचा हात सापटीत अडकला. हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमध्ये उपस्थित महिलेसह इतर नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. चिमुकली वेदनेने रडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तिचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात आला आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या घटनेचा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिफ्टचा वापर करताना विशेषतः लहान मुलांकडे सतत लक्ष ठेवण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group