पिंपरी (Pclive7.com):- पाणीपुरवठा, खोदकामामुळे रस्ता बंद, वाहतूक मार्गात बदल अशी प्रत्येक माहिती शहरवासियांना आता ‘पिंपरी चिंचवड-वन’ या अॅपद्वारे मिळणार आहे. महापालिकेने ‘पिंपरी चिंचवड-वन’ या नावाने मोबाईल अॅप कार्यन्वित केले आहे. या मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या अॅपचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.
एक दिवस आधिच ही माहिती मिळाल्याने नागरिकांचा मनस्ताप आता कमी होणार आहे. या अॅपचा महापालिकेने आजपासून वापर सुरु केला असून उद्यापासून पोलीस देखील वापर करण्यास सुरुवात करणार आहेत. प्लेस्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. महापालिका हे अॅप चालविणार असून त्याचा खर्च राज्य सरकारने केला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, नागरिकांना माहिती देणे व ती उपलब्ध करणे हे सुशासनासाठी उपयुक्त आहे. ‘पिंपरी चिंचवड वन अॅप’ हे महापालिकेसाठी महत्वाचा पुढाकार असून योग्य रणनिती आहे. याद्वारे महापालिका थेट नागरिकांच्या संपर्कात राहील. आपत्ताकालीन वेळेस पालिकेला कोणते आवाहन करायचे असल्याच या अॅपद्वारे केले जाईल. आजारांबाबत जनजागृती केली जाईल. शहरामध्ये होणा-या घडामोडीची माहिती तातडीने नागरिकांना या अॅपद्वारे मिळणार आहे.
‘पिंपरी चिंचवड-वन’ मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी शहरांची संपुर्ण माहिती, चित्रफित, संदेश, तसेच कोणतीही तातडीची माहिती अॅप द्वारे शोधता येईल. या अॅप मध्ये माहितीचे विविध विषयवार स्वतंत्र भाग केले असून त्याबाबतचे नवे अपडेट त्या भागामध्ये विषयवार समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचा महापालिकेने वापर सुरु केला असून पोलीस देखील त्याचा उद्यापासून वापर सुरु करणार आहेत. तसेच महापालिका, सारथी अॅपला हे लिंक करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. उत्सवादरम्यान कुठला रस्ता बंद ठेवण्यात आला आहे, याची सर्व माहिती नागरिकांना या अॅपवरुन मिळणार आहे.






















Join Our Whatsapp Group