पिंपरी (Pclive7.com):- अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतू त्यांचे विचार बाजूला ठेवण्याचे प्रयत्न सत्ताधारी भाजपाकडून सुरू आहेत. ‘असत्य, हिंसा, अशांती’च्या मार्गाने सध्या भाजपचा कारभार सुरू आहे. त्याच्या निषेधार्ध उद्या महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी ‘मौन’धारण करून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक डब्बू आसवानी आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या १४९ व्या जयंती निमित्त उद्या सर्वत्र कार्यक्रम होणार आहेत. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र्य मिळवून दिले. तसा इतिहास सर्वांपुढे आहे. परंतू त्यांचे विचार आता बाजूला ठेवण्याचे प्रयत्न केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने सुरू केलेत. भाजप सरकारकडून फसव्या धोरणांची घोषणाबाजी झालीयं. सर्वत्र कायदा सुव्यवस्था ढासळी आहे. आर्थिक परिस्थीती देखील पूर्णपणे कोलमडली आहे. त्याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने ‘मौन’धारण आंदोलन करणार आहे. राज्यभर जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी उद्या दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजोपर्यंत हे आंदोलन होणार आहे.
सत्य, अहिंसा आणि शांती ही तत्वे महात्मा गांधीची होती. परंतू सत्ताधारी भाजपाने असत्य, हिंसा आणि अशांतीच्या मार्गाने कारभार सुरू केला आहे. राज्यात सर्वत्रच अशांती आहे. पिंपरी चिंचवड शहरात नुकत्याच बलात्कार आणि खूनाच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या घटना काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. पोलीस आयुक्त तसेच ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांना याबाबत पत्र देखील दिले आहे. पोलीसांनी ठोस निर्णय घेतले पाहिजे. कोणाचेही असं कृत्य करण्याचे धाडस होता कामा नये. कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे म्हणूनच उद्या अहिंसेच्या मार्गाने राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.






















Join Our Whatsapp Group