पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लू, डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झालायं. सर्वत्र पाणी टंचाई सुरू असताना सत्ताधारी भाजपाचे पदाधिकाऱ्यांचे दौरे कशाला काढले जातात असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिल्ली येथे ई-शाळा पाहण्यासाठी पदाधिकारी व नगरसदस्य दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याचे फलित काय? असा सवाल नगरसेवक मयुर कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारला आहे. कलाटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मधील पदाधिकारी व नगरसदस्यांचा दिल्ली दौरा चालू आहे. या दौ-याचे फलित काय आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थित बाक नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, संडास बाथरुमची सोय नाही. शिक्षक कमी आहेत. भौतिक साधने कमी आहेत. आणि ई शाळा तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे आहे त्या शाळाच सुधारण्याची गरज आहे.
मागील सप्टेंबर महिन्यात गुजरात येथील अहमदाबाद येथे काही नगरसदस्य तेथील विकास कामे पाहण्यासाठी गेले होते. तेथील बीआरटी, नदी सुधार प्रकल्प पाहून आले. त्याचा किती फायदा शहरासाठी झाला हे आपल्या डोळ्यासमोरच आहे. शहरातील बीआरटीची अवस्था आणि नद्यांची अवस्था आपण पहातच आहात. शेजारच्या पुणे महापालिकेने नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत ७०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांसाठी महापालिकेने केंद्राकडून किती रुपये आणले हे सांगावे.
शहरात आज मुलभूत सुविधांची वानवा आहे, कच-यांचा प्रश्न गंभीर आहे. दोन–दोन दिवस कचरा उचलला जात नाही. भर पावसाळ्यात पाण्यासाठी नागरीकांना वणवण फिरावे लागते. नाहीतर पाणी माफीयाकडून अवाच्या सव्वा दराने पाणी विकत घ्यावे लागते. मनपाचे सगळ्या प्रकारचे कर भरुन प्रामाणिक करदात्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. शहरात भटकी कुत्री, डुकरे यांचा सुळसळाट झालेला आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. सार्वजनिक वाहतूकीचे बारा वाजलेले आहेत. रस्त्याची अवस्था तर रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी झालेली आहे. शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्याच्यावर नागरीकांना लसी, गोळ्या मिळत नाहीत बाहेरुन घ्याव्या लागत आहेत. शहरातील इतके गंभीर प्रश्न सोडविण्याऐवजी दौरे काढून काय फायदा होणार आहे. आणि सत्ताधारी व प्रशासन हे शहर स्मार्ट सिटी करण्यास निघाले आहे. सत्ताधारी भाजप व प्रशासनाने या सुविधा जरी सोडविल्या तरी नागरीक त्यांना धन्यवाद देतील. असे दौरे काढण्यापेक्षा शहरातील नागरीकांसाठी अत्यावश्यक असणा-या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे असे नगरसेवक मयुर कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group