आळंदी (Pclive7.com):- चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी येथे माऊलींच्या समाधीवर अष्टविनायकांपैकी सातवा गणपती असलेल्या श्री वरद विनायक मंदिर यांच्या रूपाची आकर्षक चंदन ऊटी साकारण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने माऊलींच्या समाधीवर विविध देवदेवतांची रूपे साकारण्याची परंपरा जपण्यात आली. यंदा अष्टविनायकातील वरद विनायकाचे रूप साकारल्याने वारकरी संप्रदाय आणि स्थानिक भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
ही मोहक चंदन ऊटी पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार अभिजीत धोंडफळे आणि मोरेश्वर जोशी यांनी आपल्या उत्कृष्ट कलाकुसरीतून साकारली. चंदनाच्या ऊटीसह केलेली सुबक पुष्पसजावट मंदिराच्या गाभाऱ्याला अधिकच विलोभनीय बनवत होती.

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भक्त आळंदीत दाखल झाले होते. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली. या आगळ्यावेगळ्या रूपामुळे आळंदी नगरीत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.





















Join Our Whatsapp Group