अन्यथा संत तुकाराम नगरचे ‘टपरीनगर’ नामकरण करा; नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा आयुक्तांना इशारा
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २० संत तुकारामनगर परिसरात टपरीधारक व टपरी माफियांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास या परिसराचे नाव ‘टपरीनगर’ करण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जितेंद्र ननावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत तुकारामनगर, मेट्रो स्टेशन परिसर, वल्लभनगर एसटी स्थानक, वाय.सी.एम. रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. टपरी माफियांनी पदपथांवर अतिक्रमण करून त्या जागा पथारीवाले व फेरीवाल्यांना भाड्याने देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या टपऱ्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना चालण्यासाठीही जागा उरलेली नाही. विशेष म्हणजे, रुग्णालयांच्या परिसरात अतिक्रमण झाल्याने रुग्णवाहिका वेळेवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याची बाबही समोर आली आहे.

तसेच, टपरीधारकांकडून कचरा व सांडपाणी रस्त्यावर टाकले जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांना दमदाटी व दबावाला सामोरे जावे लागत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रशासन कारवाईसाठी गेले असता काही टपरीधारकांकडून राजकीय दबाव आणला जात असल्याचेही ननावरे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, अनधिकृत टपऱ्यांवर तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे, वाहतूक सुरळीत करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली आहे. अन्यथा, संत तुकारामनगरचे ‘टपरीनगर’ असे नामकरण करण्याची कार्यवाही करावी, अशी उपरोधिक मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group