पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांचा मुलगा शंतनू नांदगुडे याच्यासह चार जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वाकड येथे घडली.
शंतनू ऊर्फ नाना विलास नांदगुडे (रा. पिंपळे निलख) व त्याचे तीन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत वाकड येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंतनू यांचे वडील विलास नांदगुडे आणि आई सुजाता नांदगुडे हे दोघेही जण माजी नगरसेवक आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि शंतनू नांदगुडे यांचा जमिनीवरून वाद सुरू आहे. याच वादातून ४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून मुंबई बंगलोर महामार्गावरील वाकड येथील भुयारी मार्गाजवळ फिर्यादी यांना गाठले. त्यावेळी आरोपींपैकी काहींच्या हातात लोखंडी रॉड होते. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी तिथे असलेल्या फिर्यादी यांची आई, बहीण, आत्या या फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आल्या असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केंगार अधिक तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group