पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी होती. या बैठकीस स्थायी समिती सभापती ममता गायकवाड वैयक्तिक कारणाने गैरहजर असल्याने सभापतीच्या आसनावर स्थानापन्न होण्याचा मान समितीतील सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्य विलास मडिगेरी यांना मिळाला. मडिगेरी यांनीही या संधीचे सोने करीत सुमारे ९२ कोटी ९६ लाख रुपयांच्या कामांना मान्यता देत विकासकामांना हिरवा कंदील दाखवला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना मिळाले. त्यानंतर दुस-या वर्षाच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रबळ दावेदार असतानाही गटातटाच्या राजकारणामुळे ऐनवेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना पदाने हुलकाविणी दिली. त्यांच्याऐवजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या पिंपळे निलखच्या नगरसेविका ममता गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागली. त्यांच्या हाती महापालिकेच्या आर्थिक चाव्या गेल्या होत्या. काल झालेल्या बैठकीला सभापती ममता गायकवाड वैयक्तीक कारणामुळे गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे जेष्ठ सदस्य विलास मडिगेरी यांना एक दिवसाचे सभापती होण्याचा मान मिळाला. त्यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात सभेचे कामकाज पार पाडले.






















Join Our Whatsapp Group