पिंपरी (Pclive7.com):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनावश्यक साऊंड व डीजे खर्च टाळत, प्रभागातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी तब्बल पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा स्तुत्य उपक्रम नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे यांनी हाती घेतला आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहराचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे आणि आरंभ सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मधील लालटोपीनगर, मोरवाडी, विद्यानगर, इंदिरानगर, दत्तनगर, परशुराम नगर, शंकरनगर आणि अण्णासाहेब नगर या भागांतील दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

आरंभ फाउंडेशनच्या वतीने ‘यशस्वी भव’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाते. या नव्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. “प्रभागातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मर्यादित आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत निश्चितच उपयोगी ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील,” असे तुषार हिंगे यांनी सांगितले.
या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, सामाजिक जाणीवेचा आदर्श ठरणारा निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे.





















Join Our Whatsapp Group