पुणे (Pclive7.com):- मागच्याच आठवड्यात मध्यवस्तीत असलेल्या कसबा पेठेत रस्त्यावर पार्क केलेल्या ५ दुचाकी जाळल्याची घटना ताजी आहे. त्यामध्येच आज आणखी एक असा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील गंज पेठ परिसरात एका नाल्याजवळ पार्क केलेल्या ५ दुचाकी अज्ञातांनी जाळल्या आहेत. हा प्रकार गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अग्निशमन दलाचे जवान प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३.१५ च्या सुमारास दुचाकींना आग लागल्याची माहिती कॉलद्वारे मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी तातडीने गंज पेठ विभागाची अग्निशमन दलाची गाडी रवाना करण्यात आली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही दुचाकी जळताना दिसत होत्या. या गाड्यातील पेट्रोलमुळे आग अधिक भडकत होती. त्यानंतर जवानांच्या मदतीने काही मिनिटात ही आग आटोक्यात आली. परंतु यामध्ये पाचही दुचाकी आगीत जळून खाक झाल्या होत्या.
मंगळवारी (५ डिसेंबरला) पुण्यातील कसबा पेठेतील माळवदकर गल्लीत रस्त्यावर पार्क केलेल्या ५ दुचाकी अज्ञातांनी जाळल्या होत्या. ही घटनाही मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. मागील काही दिवसांपासून पुण्यात वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे पोलीस या सर्व घटनांवर कशा प्रकारे कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





















Join Our Whatsapp Group