महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप आक्रमक
पिंपरीत स्वतंत्र ‘मॉनिटरिंग सेल’ स्थापन करण्याची मागणी; महापौरांचे ठोस कारवाईचे आदेश
पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवी येथील ‘आशा शंकर प्लाझा’ सोसायटीमध्ये ९ मे रोजी घडलेली लिफ्ट दुर्घटना अत्यंत भीषण होती. या घटनेत ७ नागरिक तब्बल ३ तास मृत्यूच्या छायेखाली अडकून पडले होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली. मात्र, वाढत्या हाय-राईज इमारतींच्या शहरात प्रत्येक वेळी नशिबावर विसंबून चालणार नाही. शहरातील लिफ्ट सुरक्षेचा आणि ‘सेफ्टी ऑडिट’चा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने स्वतंत्र ‘लिफ्ट मॉनिटरिंग सेल’ स्थापन करावा, अशी आक्रमक मागणी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत केली.

या विषयाचे गांभीर्य ओळखून महापौर रवी लांडगे यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलून कडक कारवाई करावी, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. प्रशासनाला धारेवर धरताना जगताप म्हणाले, ‘‘चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘लिफ्ट ऑडिट’ संदर्भात विधानसभेत प्रश्न विचारले होते. त्यावर शासनाकडून एक विशेष समिती देखील नियुक्त करण्यात आली होती. या समितीने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सध्या शहरात काम करत आहे का? आणि या निकषांची अंमलबजावणी शहरात किती प्रमाणात झाली आहे, याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे.’’

जगताप पुढे म्हणाले शहरातील सोसायटी तसेच निर्माण संस्थांमध्ये लिफ्ट सेफ्टी ऑडिटची सद्यस्थिती बाबत महापालिका शहानिशा करत आहे का? शहरातील किती गृहनिर्माण सोसायट्यांचे लिफ्ट ‘सेफ्टी ऑडिट’ पूर्ण झाले आहे? ज्या सोसायट्यांनी अद्याप हे ऑडिट केलेले नाही, त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार?. लिफ्ट रेस्क्यूसाठी आपल्या अग्निशामक दलाकडे हायड्रोलिक कटर, स्प्रेडर्स यांसारखी अद्ययावत साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का? नसेल तर त्याच्या खरेदीचे नियोजन काय आहे असे प्रश्न जगताप यांनी सभागृहासमोर उपस्थित केले.
‘स्वस्त’ मेंटेनन्समुळे धोक्यात वाढ!
शहरातील अनेक सोसायट्या अधिकृत कंपन्या टाळून स्वस्त दरात लिफ्टचे मेंटेनन्स करून घेतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. केवळ नामांकित आणि अधिकृत कंपन्यांकडूनच देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच अनेक लिफ्टमध्ये ‘ओव्हरलोड अलार्म’ असूनही ते काम करत नाहीत. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक सोसायटीला लिफ्ट वापराचे नियम आणि फलक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी जगताप यांनी केली.
“नागरिकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने स्वतंत्र ‘लिफ्ट मॉनिटरिंग सेल’ स्थापन करावा आणि आमदार शंकर जगताप यांनी सुचवलेल्या सुचनांची तात्काळ अंमलबजावणी करावी.”– ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगतापनगरसेवक, नवी सांगवी.




















Join Our Whatsapp Group