पिंपरी (Pclive7.com):- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरातील नाले, स्ट्रॉम वॉटर आणि ड्रेनेज लाईनची सफाई केली जाते. मात्र यंदा अद्यापही अनेक भागांमध्ये सफाई झालेली दिसून येत नाही. दरम्यान, हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

सफाईअभावी नाल्यांमध्ये व ड्रेनेज लाईनमध्ये कचरा साचून पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच साचलेल्या पाण्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची त्वरित सफाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.




















Join Our Whatsapp Group