पिंपरी (Pclive7.com):- सोशल मीडियावर ‘इन्स्टंट लोन’ देण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट लोन अॅप्सचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांनी अशा अॅप्सपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सायबर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुन्हेगार सोशल मीडियाद्वारे तात्काळ कर्ज मिळण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये बनावट लोन अॅप डाउनलोड होते. हे अॅप इन्स्टॉल करताना संपर्क क्रमांक, फोटो, लोकेशन आणि इतर वैयक्तिक माहितीची परवानगी घेतली जाते. यानंतर नागरिकांना अल्प रकमेचे कर्ज देऊन त्यांच्याकडून जादा व्याजाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास मोबाईलमधील फोटो आणि संपर्क माहितीचा गैरवापर करून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये फोटो मॉर्फ करून व्हॉट्सअॅपद्वारे नातेवाईकांना पाठवण्याचे प्रकारही घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणतेही लोन अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनोळखी APK फाईल्स किंवा लिंकवर क्लिक करू नये, मोबाईलमधील अनावश्यक परवानग्या देऊ नयेत आणि अॅपचे रिव्ह्यू व रेटिंग तपासूनच वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे. फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group