विकासकाने ‘बी’ विंगमध्ये तीन मजल्यावरील १४ अनधिकृत फ्लॅटची विक्री?
पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी (ता. हवेली) येथील वडिलोपार्जित जमिनीवर गृहप्रकल्प उभारताना विकासकाने जागामालकांची फसवणूक केल्याचा आणि महापालिकेच्या नियमांना हरताळ फासत तब्बल तीन मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मे. साई बिल्डकॉनचे भागीदार पवन वाधवानी यांनी मंजूर नकाशाचे उल्लंघन करून ‘साई संकुल’ प्रकल्पाच्या ‘बी’ विंगमध्ये बेकायदेशीरपणे चौथा, पाचवा आणि सहावा मजला उभारल्याचे समोर आले असून, त्यातील १४ फ्लॅटची लाखो रुपयास विक्री केल्यामुळे बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील सर्व्हे क्र. ६४/५/१, ६४/१/३, ६३/१/४, ६४/१/५ या एकत्रित मिळकतीवरील ४३.५० आर ही वडिलोपार्जित जमीन विकसनासाठी जागा मालकांनी ‘मे. साई बिल्डकॉन’ तर्फे भागीदार पवन वाधवानी यांना दिली होती. त्यानुसार हवेली क्र.५ दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकृत आणि नोंदणीकृत विकसन करारनामा (दस्त क्र. २२३२) करण्यात आला होता. या करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार, प्रकल्पात होणाऱ्या एकूण बांधकामा पैकी ५० टक्के बांधकाम क्षेत्र हे मूळ जागामालकांना मिळणे बंधनकारक आणि अपेक्षित होते.
या जागेवर विकासकाने ‘साई संकुल’ या नावाने ‘विंग-ए’ आणि ‘विंग-बी’ अशा दोन टोलेजंग इमारती उभारल्या. या बांधकामासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम व परवानगी विभागाकडून सुरुवातीला ‘बीपी रहाटणी ६४/२००९’ अन्वये परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर ‘सुधारित बांधकाम परवानगी बीपी रहाटणी २५/२०११’ नुसार मंजुरी देण्यात आली. या मंजूर नकाशा आणि परवानगीनुसार, ‘विंग-ए’ मध्ये ४९ निवासी सदनिका (फ्लॅट्स) आणि ‘विंग-बी’ मध्ये २४ निवासी सदनिका बांधण्यास मंजुरी होती.
महानगरपालिकेने दिलेल्या अधिकृत परवानगीनुसार, ‘ए’ विंगसाठी ‘जी + ६’ (तळमजला अधिक ६ मजले) आणि ‘बी’ विंगसाठी ‘पार्किंग + ३’ (पार्किंग अधिक ३ मजले) अशा इमारतींच्या रचनेला मंजुरी देण्यात आली होती. म्हणजेच ‘बी’ विंगमध्ये केवळ तीन निवासी मजले बांधणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र, बांधकाम विकासक पवन वाधवानी यांनी महापालिकेच्या नियमांना आणि मंजुरीला धाब्यावर बसवून, ‘बी’ विंगवर प्रत्यक्षात चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्णपणे अनधिकृतपणे बांधला.

विकासकाच्या या मनमानी कारभारामुळे महापालिकेच्या बांधकाम नियमावलीचे (UDCPR) सरळ-सरळ उल्लंघन झाले आहे. तसेच, करारनाम्यानुसार जागामालकांना मिळणारा ५० टक्के बांधकामाचा हक्क डावलून, अतिरिक्त अनधिकृत मजले लाटून जागामालकांचीही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप होत आहे. महापालिकेच्या मंजुरीपेक्षा दुप्पट मजले उभारून विकासकाने सर्वसामान्य फ्लॅट धारक आणि जागामालक दोघांनाही अंधारात ठेवले आहे. या सर्व्हे नंबरवरील बेकायदेशीर बांधकामावर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मे. साई बिल्डकॉनच्या भागीदारांवर महानगरपालिका कडक कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करा..
रहाटणी येथील मे. साई बिल्डकॉन या बांधकाम व्यावसायिकाने उभारलेल्या ‘साई संकुल’ गृहप्रकल्पातील अनधिकृत बांधकामाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पातील ‘बी’ विंगमधील चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्णपणे अनधिकृतपणे बांधण्यात आला असून, महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे मान्य करूनही अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या अनधिकृत मजल्यांवर तात्काळ निष्कासन कारवाई करावी आणि संबंधित विकसकावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी भाजप नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक..
रहाटणी परिसरामध्ये मे. साई बिल्डकॉन या विकासकाकडून ‘साई संकुल’ नावाचा मोठा गृहप्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या ‘बी’ विंगमध्ये मंजूर नकाशे आणि नियमांना हरताळ फासत विकासकाने तब्बल तीन मजले अनधिकृतपणे लाटल्याचे उघड झाले आहे. इमारतीचा चौथा, पाचवा आणि सहावा मजला कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय उभारण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तीन मजल्यांवर तब्बल १४ फ्लॅट्सचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, त्यांची सर्वसामान्य नागरिकांना विक्री करून करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
बांधकाम विभागाकडून कारवाईकडे चालढकल..
या गंभीर प्रकाराबाबत तक्रारदार निलेश नढे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे रीतसर पत्र देऊन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असता, बी विंगमधील हे तीन मजले आणि त्यावरील फ्लॅट्स पूर्णपणे अनधिकृत असल्याचे पालिकेनेही अधिकृतपणे मान्य केले आहे. मात्र, हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध होऊन आणि तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही, महापालिका प्रशासनाने मागील एक वर्षापासून या विकसकाच्या अनधिकृत तीन मजल्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
महापालिका आयुक्ताकडे तक्रार..
महानगरपालिका बांधकाम विभागातील अधिका-याच्या आणि बिल्डरच्या आर्थिक संगणमतामुळे संबंधितावर अद्याप कारवाई होत नाही. या संशयास्पद दिरंगाईमुळे आणि ढिसाळ कारभारामुळे तक्रारदार आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक विनोद नढे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना आणि बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि बेकायदेशीर बांधकाम उभी करणाऱ्या अशा बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घालणे बंद करावे.
‘साई संकुल’च्या ‘बी’ विंगमधील अनधिकृत चौथा, पाचवा आणि सहावा मजला तात्काळ जमीनदोस्त (निष्कासन कारवाई) करण्यात यावा. तसेच, अनधिकृत बांधकाम करून नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मे. साई बिल्डकॉनच्या संबंधित विकसकावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (MRTP Act) अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. पालिकेने यावर तात्काळ पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पोलिस आयुक्तांकडे तक्रार..
मे. साई बिल्डकॉन तर्फे भागीदार पवन रघुमल वाधवानी यांनी आम्ही कुठल्याही प्रकारची समंती दिलेली नसताना खोट्या कागदपत्राचा दुरुपयोग करुन कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर केला आहे. आमची फसवणूक केली आहे. आम्हाला देय असलेल्या बांधकाम आम्हाला न देता त्याची परस्पर विक्री केली आहे. आम्हाला बनावट कागदपत्रे व परवानगी बनवून ते ख-या असल्याचे भासवून आमची व शासनाची फसवणूक व विश्वासघात केला आहे. तसेच २०११ ते २०१८ पर्यंत सदनिकाचे भाडे वसुल केले आहे. आमची सुमारे ३० कोटीची फसणवूक केली असून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारती सुदाम नढे, जयराम बाबुराव नढे, ज्ञानेश्वर नढे, गणेश नढे यांनी पोलिस आयुक्ताकडे केली आहे.



















Join Our Whatsapp Group