पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक सखल भाग, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे व लहान नाले स्वच्छ करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र काल झालेल्या जोरदार पावसानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला, तर अनेक भागांतील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या.

नालेसफाईची कामे वेळेत आणि प्रभावीपणे झाली असती, तर अल्पावधीत झालेल्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेची क्षमता, नाल्यांची प्रत्यक्ष साफसफाई आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, अनेक नागरिकांनी प्रशासनाने केवळ कागदोपत्री नालेसफाई दाखवली का, अशी शंका व्यक्त केली आहे. शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. तसेच संबंधित विभागांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group