पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना कुत्रा पाळणाऱ्या तसेच परवाना असतानाही निष्काळजीपणा करणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संकल्प युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात केवळ सुमारे ४०० नागरिकांनी महापालिकेचा अधिकृत परवाना घेऊन कुत्री पाळली आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर नागरिक विनापरवाना कुत्री पाळत असून अशा कुत्र्यांची योग्य निगा, लसीकरण आणि नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे नागरिकांवर हल्ले, चावण्याच्या घटना आणि रेबीजचा धोका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
झोपडपट्ट्या, चाळी, घरकुल योजना तसेच पुनर्वसन प्रकल्पांतील इमारतींमध्ये मर्यादित जागेत कुत्री पाळली जात असून त्यांना अनेकदा रस्त्यावर मोकाट सोडले जाते. त्यामुळे कुत्र्यांच्या झुंडी तयार होऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच शहरातील वॉशिंग सेंटर, गॅरेज, टपऱ्या, छोटी दुकाने आणि हॉटेल व्यावसायिकांकडूनही विनापरवाना कुत्री पाळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही कुत्री रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने अपघात आणि जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विनापरवाना घरे किंवा नळजोडणी करणाऱ्यांवर जशी फौजदारी कारवाई केली जाते, त्याच धर्तीवर विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच परवाना असूनही कुत्र्यांची योग्य काळजी न घेणारे, लसीकरण न करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना मोकाट सोडणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, शहरात वाढत्या कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगत महापालिकेने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही गणेश जगताप यांनी दिला आहे.


















Join Our Whatsapp Group