पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील ‘गणेशम फेज-२’ सोसायटीमध्ये १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर भाजपने महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शहरातील वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर ५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्या व प्लॅटफॉर्म्स अग्निशमन दलाच्या ताफ्यात तातडीने समाविष्ट करावेत, अशी मागणी काटे यांनी केली आहे. तसेच अग्निशमन दलातील वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क आणि इतर बचाव साहित्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करून नादुरुस्त व जुने साहित्य बदलण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘गणेशम फेज-२’ येथील आगीच्या घटनेत बंद फ्लॅटमध्ये दोन लहान मुली अडकल्या होत्या. बचावकार्यात उपकरणे आणि नियोजनाशी संबंधित अडचणी निर्माण झाल्याचा दावा करत काटे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष या बाबीकडे वेधले आहे. शहरात २० ते ३० मजली इमारतींची संख्या वाढत असताना त्यानुसार अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या प्रमुख मागण्या..
५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्या/प्लॅटफॉर्म्सची तातडीने खरेदी करावी.
शहरातील सोसायट्यांच्या फायर ऑडिटचा अहवाल सात दिवसांत सार्वजनिक करावा.
किती सोसायट्यांचे फायर ऑडिट झाले, कुठे त्रुटी आढळल्या आणि किती सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, याची माहिती जाहीर करावी.
अग्निशमन दलातील सर्व वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क व बचाव साहित्याचे सेफ्टी ऑडिट करावे.
नादुरुस्त व कालबाह्य उपकरणे बदलून अत्याधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत.
अग्निशमन जवानांना उंच इमारतींमधील आपत्कालीन बचावकार्याचे प्रशिक्षण द्यावे.
शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नियमित मॉकड्रिल आयोजित कराव्यात.
“पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचा आणि त्यांच्या लहान मुलांचा जीव अत्यंत मोलाचा आहे. केवळ इमारतींना मंजुरी देऊन करवसुली करण्यापुरती महापालिकेची जबाबदारी मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गणेशम फेज-२ मधील घटना ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. महापालिकेने येत्या ८ ते १० दिवसांत या मागण्यांवर ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group