पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आणि MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला अवैध पिस्टलसह ताब्यात घेतले. आरोपीकडून ५३ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टल, दोन मॅग्झिन्स आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. राहुल रमेश चव्हाण (वय २६, रा. भारतमातानगर, दिघी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप पोटे यांना राहुल चव्हाण याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पठारे मळा, ९० फुटी रोड, म्हसोबा देवस्थानसमोरील मोकळ्या जागेत, चऱ्होली बुद्रुक येथे सापळा रचून राहुल चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून पिस्टल, दोन मॅग्झिन्स आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, राहुल चव्हाण हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव आणि संदीप गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



















Join Our Whatsapp Group