पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. फौजदारी खटला, विभागीय चौकशी आणि परिविक्षाधीन कालावधी प्रलंबित असताना मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड यांच्याकडे प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचा आरोप नढे यांनी केला आहे.

विनोद नढे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात या नियुक्तीची चौकशी करून संबंधित अतिरिक्त कार्यभार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रकरणात राठोड यांचे निलंबन रद्द करताना महापालिका आयुक्तांच्या २७ मे २०१९ रोजीच्या आदेशातील काही अटींनुसार त्यांना आर्थिक स्वरूपाशी संबंधित किंवा जनसंपर्क असलेले काम न देता केवळ अध्यापनाचे अकार्यकारी कामकाज देण्याचे निर्देश होते. असे असताना त्यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी पदाचा प्रशासकीय व आर्थिक अधिकार असलेला अतिरिक्त कार्यभार कसा सोपविण्यात आला, असा सवाल नढे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, २८ नोव्हेंबर २०२२ च्या महापालिका आदेशानुसार एसीबी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने राठोड यांचा मुख्याध्यापक पदावरील परिविक्षाधीन कालावधी अद्याप मंजूर झालेला नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. विभागीय चौकशी आणि शासनाच्या संबंधित परिपत्रकांचेही उल्लंघन झाल्याचा आरोप नढे यांनी केला आहे.

प्रभारी पद देताना सेवाज्येष्ठतेचा विचार करण्यात आलेला नसल्याचे सांगत नढे यांनी ‘कॅच-अप’ नियम तसेच शासनाच्या ७ मे २०२१ रोजीच्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. माध्यमिक शिक्षण विभागात सेवाज्येष्ठ व निष्कलंक मुख्याध्यापक उपलब्ध असताना त्यांना डावलून राठोड यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या..
प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदाच्या आदेशाची मूळ टिप्पणी व मंजुरीची सत्यप्रत उपलब्ध करून द्यावी.
राठोड यांना दिलेला अतिरिक्त कार्यभार तात्काळ रद्द करावा.
त्यांना पूर्वीच्या अकार्यकारी कामकाजावर ठेवावे.
सेवाज्येष्ठतेनुसार प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदाची नियुक्ती करावी.
नियमबाह्य निर्णयास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
संपूर्ण प्रशासकीय कारभाराची चौकशी करावी.
या प्रकरणाची मुख्यमंत्री स्तरावरून दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विनोद नढे यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group