पिंपरी (Pclive7.com):- मोरेवस्ती, चिखली येथील भीमशक्तीनगर झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून संपूर्ण प्रकल्पाचे बायोमेट्रिक फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात जाधव यांनी भीमशक्तीनगर SRA प्रकल्पातील प्राथमिक पात्रता-अपात्रता यादी, संमतीपत्रे आणि सर्वेक्षण प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले आहे.
मारूती जाधव यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आलेल्या पात्रता-अपात्रता यादीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काही झोपडीधारकांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष स्थानिक रहिवासी नसलेल्या व्यक्तींची किंवा त्यांच्या नातेवाईकांची नावे यादीत समाविष्ट झाल्याचे आरोपही होत असल्याने संपूर्ण यादीची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

SRA प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या संमतीपत्रांच्या प्रक्रियेबाबतही नागरिकांकडून आक्षेप घेतले जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. काही नागरिकांवर दबाव टाकून किंवा आर्थिक आमिष दाखवून संमतीपत्रे घेतल्याचे आरोप होत असल्याने संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक संमतीपत्रासोबत संबंधित झोपडीधारकाची ओळख, वास्तव्य, प्रत्यक्ष ताबा तसेच स्वाक्षरी किंवा अंगठ्याची स्वतंत्र पडताळणी करण्यात यावी, असेही त्यांनी सुचविले.

भीमशक्तीनगर SRA प्रकल्पाचे SRA प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे बायोमेट्रिक फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी जाधव यांनी केली आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रत्यक्ष लाभार्थी, त्यांचे वास्तव्य आणि पात्रता याबाबत अधिक पारदर्शकता निर्माण होईल, असा त्यांचा दावा आहे.
फेरसर्वेक्षणादरम्यान प्रत्येक झोपडीधारकाची प्रत्यक्ष उपस्थिती, झोपडीचे अचूक स्थान, उपलब्ध कागदपत्रे, वास्तव्याचा पुरावा तसेच SRA प्रकल्पाला दिलेली संमती किंवा विरोध यांची नोंद करण्यात यावी. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केल्यास भविष्यातील वाद आणि गैरसमज टाळता येतील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, अंतिम आराखडा मंजूर करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना पुनर्वसन आराखडा, घरांचे क्षेत्रफळ, इमारतींची संख्या, पुनर्वसनाची जागा आणि उपलब्ध सुविधा यांची स्पष्ट माहिती देण्यात यावी. पात्र झोपडीधारकांचा सहभाग घेऊनच पुढील प्रक्रिया राबवावी, अशी भूमिकाही जाधव यांनी मांडली.
मारुती जाधव म्हणाले, “भीमशक्तीनगर SRA प्रकल्प हा स्थानिक नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे. कोणताही पात्र झोपडीधारक अन्यायाने वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये, यासाठी संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शक चौकशी आणि बायोमेट्रिक फेरसर्वेक्षण आवश्यक आहे.”
तसेच, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी व फेरसर्वेक्षण झाले नाही, तर न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. भीमशक्तीनगर SRA प्रकल्पासंदर्भातील तक्रारींवर शासन आणि संबंधित प्राधिकरणे काय भूमिका घेतात, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group