पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशांचा मोठा आवाज होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना शांत आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना रुग्णालय परिसरातच अशा प्रकारचा गोंगाट झाल्याने अनेकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ॲड. अशोक भगवान धायगुडे यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपरोधिक टीका केली आहे. रुग्णालयात आजारी, वृद्ध तसेच गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार सुरू असतात. अशा परिस्थितीत रुग्णांच्या विश्रांतीसाठी शांत वातावरण आवश्यक असताना मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित कार्यक्रमासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन झाले होते का, तसेच रुग्णालय प्रशासनाची भूमिका काय होती, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

















Join Our Whatsapp Group