पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील सुवर्ण गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात गुजरातमधील पवित्र गिरनार पर्वताची हुबेहूब ५१ फुटी भव्य प्रतिकृती साकारून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंडळाच्या ५१ व्या वर्षात पदार्पणानिमित्त उभारण्यात आलेला हा भव्य देखावा सध्या शहरातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच पिंपरी-चिंचवडच्या गणेशोत्सवालाही एक वेगळी ओळख आणि भव्यता प्राप्त व्हावी, या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम हाती घेतला. गिरनार पर्वताची प्रतिकृती अत्यंत बारकाईने आणि वास्तवदर्शी पद्धतीने साकारण्यात आल्याने भाविकांना प्रत्यक्ष गिरनार पर्वताचे दर्शन घेत असल्याचा अनुभव मिळत आहे.

विशेष म्हणजे, विविध कारणांमुळे गुजरातमधील गिरनार पर्वतावर जाऊन भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी हा देखावा एक आध्यात्मिक पर्वणी ठरत आहे. पिंपरीमध्येच गिरनार पर्वताची भव्यता अनुभवण्याची संधी मिळाल्याने नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.

मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीनंतरच्या ५१ व्या वर्षात साकारलेल्या या अनोख्या संकल्पनेचे शहरभरातून कौतुक होत असून, भाविकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

















Join Our Whatsapp Group