पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत गेल्या महिनाभरात जप्त केलेले ४१५ मॉडिफाइड सायलेन्सर आणि ५९१ अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट्स रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट केले.

वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली असून, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि गरोदर महिलांना अशा वाहनांमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

चालू वर्षातील ही पोलिसांची तिसरी मोठी कारवाई असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना यामधून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच वाहनधारकांनी शासनमान्य एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेट्सच वापराव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. बेकायदेशीर मॉडिफाइड सायलेन्सर बसवून देणारे दुकानदार, गॅरेज चालक आणि मेकॅनिक यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक) निलेश देशमुख यांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे पालन आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

















Join Our Whatsapp Group