मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली मोहीम संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी (दि.१२ ऑक्टोबर) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आयोजित या मोहिमेला महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केंद्रातील निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात मनसेने ही मोहीम हाती घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपस्थित नागरिक आणि महाराष्ट्र सैनिकांनी सह्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला.

मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख चेतन पवार, रुपेश पटेकर, राजू अवसरे, बाळा दानवले, रोमी सिंधू, अक्षय शिंदे, तुषार सोनटक्के, सागर बहुले, प्रमोद अडसुळे, संतोष यादव, दत्ता डांगे, प्रतीक कांबळे, वैभव फाळके, आकाश कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला. आगामी काळातही राज ठाकरे यांच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला.

















Join Our Whatsapp Group