पिंपरी (Pclive7.com):- वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात उपचारासाठी नेताना वृद्ध रुग्ण धावत्या रुग्णवाहिकेतून खाली पडल्याप्रकरणी संबंधित वाहनचालक आणि वॉर्डबॉय यांना निलंबित करण्यात आले आहे. वाहनचालक अजितकुमार भगत आणि वॉर्डबॉय गजानन ठोंबरे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

वृद्ध रुग्णाला पुढील उपचारांसाठी ससूनला नेण्यात येत होते. रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद नसल्यामुळे तो खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रुग्ण पडल्याचे लक्षात आल्यानंतर पुढे गेलेली रुग्णवाहिका पुन्हा घटनास्थळी आली.

चालकाने वृद्धाला पुन्हा रुग्णवाहिकेत घेतले आणि तेथून निघून गेल्याचेही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या घटनेप्रकरणी महापालिकेने संबंधित वाहनचालक आणि वॉर्डबॉय यांना सुरुवातीला नोटीस बजावली होती. आता दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या दोघांवर कारवाई झाली असली, तरी रुग्णवाहिका रवाना करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी झाली होती का, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. दरवाजा आणि स्ट्रेचरच्या लॉकमध्ये तांत्रिक दोष होता की कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेतली नाही, याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.

















Join Our Whatsapp Group