पुणे-पिंपरी-चिंचवडमधील ९५ सोसायट्यांचा सहभाग; दापोलीतील ३४६ गरजूंना वर्षभराच्या अन्नपुरवठ्यासाठी मदतीचा आधार
पिंपरी (Pclive7.com):- मूठभर धान्याच्या दानातून गरजूंना अन्नाचा आधार देणाऱ्या ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानाने यंदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वपित्री अमावस्येनिमित्त १० ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष उपक्रमात एकाच दिवसात तब्बल २६ हजार किलो धान्याचे संकलन करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ९५ गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पाच सामाजिक संस्थांमधील ३४६ लाभार्थ्यांना होणार आहे.

पाच संस्थांमधील ३४६ लाभार्थ्यांना मदत..
पितृपक्षात पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान करण्याच्या परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड देत हे अभियान राबविण्यात येते. नागरिकांनी दिलेल्या धान्याचे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. यंदाच्या विशेष उपक्रमातून दापोलीतील पाच संस्थांमधील विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विशेष गरजा असलेल्या मुलींच्या अन्नपुरवठ्यासाठी मदतीचा आधार उभा राहिला आहे.

या संस्थांमधील लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
वनवासी कल्याण आश्रम, दापोली : १०५ वनवासी विद्यार्थी
कस्तुरबा कन्या छात्रालय, दापोली : ७४ विद्यार्थिनी
कै. गणेश दत्तात्रेय दातार वृद्धाश्रम : ४२ निराधार ज्येष्ठ नागरिक
स्नेहदीप, दापोली : ६० दिव्यांग लाभार्थी
आनंद फाउंडेशन, दापोली : ६५ विशेष गरजा असलेल्या मुली
पाच वर्षांत ३ लाख २६ हजार किलोहून अधिक धान्याचे संकलन
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानाचा विस्तार पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सात प्रमुख उपनगरांमधील ९५ गृहनिर्माण सोसायट्यांपर्यंत झाला आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रातील ६३ सामाजिक संस्थांना तीन लाख २६ हजार किलोहून अधिक धान्याची मदत करण्यात आली आहे.
नागरिकांचे दातृत्व, सोसायट्यांचा सामूहिक सहभाग आणि स्वयंसेवकांचे योगदान यामुळे अन्नदानाची ही चळवळ व्यापक झाली आहे. गरजूंच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी सातत्याने मदत उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

२ हजार दिवसांपासून ८५० बालकांच्या भोजनाची व्यवस्था..
अभियानाचे संस्थापक-अध्यक्ष विनोद पाटील यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “एक मुठ्ठी अनाज हे केवळ धान्यसंकलनाचे अभियान नाही, तर समाजातील प्रत्येक कुटुंबाला माणुसकीच्या धाग्याने जोडणारे पवित्र कार्य आहे. समाजाने दाखविलेल्या विश्वासामुळे गेल्या २ हजार दिवसांपासून दररोज ८५० निराधार आणि गरजू बालकांच्या भोजनाची व्यवस्था अखंडपणे सुरू ठेवता आली आहे.”
या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सोसायट्यांमधील रहिवासी, दानशूर कुटुंबे आणि अथक परिश्रम घेणाऱ्या स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले.
पद्मश्री दादासाहेब इदाते यांच्याकडून कौतुक
अभियानाच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर पद्मश्री दादासाहेब इदाते यांनी धान्य संकलनाच्या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी ३६ हजारांहून अधिक कुटुंबांना एकत्र आणून वंचित घटकांपर्यंत अन्न पोहोचविण्याच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“अशा सामाजिक चळवळींची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गरज आहे. या माध्यमातून गोरगरीब आणि वंचित बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले.

स्वयंसेवकांच्या योगदानातून अभियान यशस्वी..
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी केशव जोशी, पुष्कर सुरनीस, अभिजित चौधरी, अनिकेत देशमुख, अभिजित पुराणिक, शिवराम लटपटे, तुषार शाह, अरविंद पारखी, जितेंद्र खिस्ते, नितीन भिरूड, नितीन साळवे, प्रसाद पाडगावकर, संजय पाटील, शिखर श्रीवास्तव, तन्यय तळवाडे, वैभव करंजगांवकर, विवेक कासट, गणेश म्हस्के, अनिकेत समुद्रे, माणिक सुद्रिक, नकुल देशपांडे, रुपेश हेलवाडे, अभय बाविस्कर, कैलास शेट्टी, संदीप काळे, गणेश पाटील, शिवकुमार प्याती आणि विरल शाह यांनी परिश्रम घेतले.
मूठभर धान्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाने सामूहिक सहभागाच्या बळावर मोठ्या सामाजिक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. एका दिवसात २६ हजार किलो धान्याचे संकलन हा या अभियानाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्याच्या कार्याला यामुळे अधिक बळ मिळाले आहे.


















Join Our Whatsapp Group