पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १००० एमए (1000 MA) डिजिटल रेडिओग्राफी सिस्टिम खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेल्या २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपयांच्या अंदाजित किमतीबाबत सविस्तर पडताळणी करण्याची मागणी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी केली आहे. या खरेदीचा दर योग्य आहे का, याची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या ई-निविदा क्रमांक GEM/2026/B/7797530 अंतर्गत या वैद्यकीय उपकरणाची अंदाजित किंमत २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. या किमतीसाठी कोणते बाजारभाव, दरपत्रके, पूर्वीचे शासकीय खरेदी व्यवहार आणि आर्थिक निकष विचारात घेण्यात आले, याची माहिती घेऊन संबंधित उपकरणाचे सविस्तर Price Analysis आणि Rate Analysis करण्यात यावे, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

विविध शासकीय रुग्णालयांतील खरेदी दरांची तुलना करण्याची मागणी..
संदीप वाघेरे यांनी निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे डिसेंबर २०२१ मध्ये संबंधित मशीन सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांना पाच वर्षांच्या वॉरंटीसह पुरविण्यात आले होते. तसेच, २०२५ मध्ये राजस्थानमधील कोटा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित मशीन सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांना पुरविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील काही संस्थांच्या खरेदी दरांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्हा रुग्णालय, अमरावती येथे सुमारे २ कोटी ४९ लाख ५२ हजार ३७५ रुपये, जनरल हॉस्पिटल, वाशी येथे २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये, तर जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे सुमारे ३ कोटी ७९ लाख रुपये इतकी खरेदी किंमत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या विविध किमतींमध्ये मोठी तफावत दिसत असल्याने संबंधित उपकरणांचे अचूक मॉडेल, तांत्रिक वैशिष्ट्ये, अतिरिक्त साहित्य, स्थापना खर्च, वॉरंटी, देखभाल करार आणि कर यांचा समावेश तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित संस्थांचे मूळ खरेदी आदेश आणि अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करून किमतींमधील फरकाची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निविदेतील तांत्रिक अटींचीही तपासणी करा..
महापालिकेने निश्चित केलेली अंदाजित किंमत कोणत्या आर्थिक निकषांवर आधारित आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे. मागील दोन वर्षांत देशातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांनी समान किंवा तुलनीय तांत्रिक वैशिष्ट्ये असलेली उपकरणे कोणत्या दराने खरेदी केली, याची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे तुलना करण्यात यावी.
तसेच, निविदेतील तांत्रिक वैशिष्ट्ये आणि अटी-शर्ती वस्तुनिष्ठ, पारदर्शक व स्पर्धात्मक आहेत का, याची नियमानुसार तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

उत्पादक कंपनीकडून लेखी खुलासा घेण्याची मागणी
संबंधित मूळ उत्पादक कंपनीकडून अधिकृत लेटरहेडवर स्वाक्षरी आणि शिक्क्यासह लेखी खुलासा घेण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विविध शासकीय संस्थांना पुरविलेल्या उपकरणांचे खरेदी आदेश, तांत्रिक वैशिष्ट्ये, वॉरंटी, देखभाल करार आणि संबंधित कालावधीतील विक्री दरांची माहिती मिळाल्यास खरेदी किमतींची वस्तुनिष्ठ तुलना करणे शक्य होईल.
आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फतही संबंधित खरेदी व्यवहारांची तुलनात्मक पडताळणी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
२८ सप्टेंबरला आयुक्तांकडेही निवेदन..
या प्रकरणी संदीप वाघेरे यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडेही निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती आणि चौकशीतील निष्कर्ष लेखी स्वरूपात कळविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या निधीतून होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत योग्य बाजारभाव, दर्जेदार उपकरणे आणि पारदर्शक प्रक्रिया यांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. तपासणीत अंदाजित किंमत अवाजवी असल्याचे किंवा निविदा प्रक्रियेत नियमबाह्य बाब आढळल्यास लागू नियमांनुसार योग्य निर्णय घ्यावा. गरज भासल्यास सुधारित तांत्रिक वैशिष्ट्ये आणि योग्य बाजारभावाच्या आधारे पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
या निवेदनामागे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर आरोप करण्याचा हेतू नसून, खरेदी व्यवहारांची अधिकृत पडताळणी व्हावी, सार्वजनिक पैशांची बचत व्हावी आणि खरेदी प्रक्रिया नियमांनुसार पार पडावी, हा उद्देश असल्याचे वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि शासनाकडून खरेदी किमतीचे विश्लेषण करून अधिकृत कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट केली जाते का, याकडे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group