पिंपरी (Pclive7.com):- सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा शनिवारी (दि.२) पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषेदतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे यांच्या तोफा पिंपरी चिंचवडमध्ये धडाडणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मयुर कलाटे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, प्रवक्ते फजल शेख, वर्षा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य व केंद्र सरकारचा भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीच्या नावाने शहरात वाढलेला बकालपणा, फसलेली जिएसटी, नोटाबंदी, मंत्रीमंडळातील घोटाळे, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश असे अनेक प्रश्न घेऊन राष्ट्रवादीच्या वतीने १० जानेवारीपासून रायगड येथून निर्धार परिवर्तन यात्रा सुरू झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा दौरा करून शनिवारी ही यात्रा पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे. शनिवारी दि.२ फेब्रुवारी सायंकाळी साडे पाच वाजता पी.डब्ल्यु.डी. मैदान येथे होणार असल्याची माहिती संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.