आंबेगाव (Pclive7.com):- साकोरे (ता. आंबेगाव) येथील कडूसकर मळा भागात बिबट्याच्या हल्ल्यात श्रुतिका महेंद्र थिटे (वय ६) ही मुलगी ठार झाली आहे. रविवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली अशी माहिती वनरक्षक राजेंद्र गाढवे यांनी दिली.
या घटनेने शेतात काम करणार्या महिला भयभीत झाल्या आहेत. मंचर येथील जिल्हा आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता श्रुतिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, गाडेपट्टी कडूसकर मळा साकोरे भागात ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने साडेपाचच्या सुमारास श्रुतिका कुसूम वर हल्ला केला, ती आजीबरोबर घरामागील शेतात गेली होती. अचानक उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर आला. बांधावर खेळत असलेल्या श्रुतिकाला बिबट्याने पकडले. उसाच्या शेतात ओढत नेले. या वेळी बाळासाहेब ऊर्फ देवराम तुकाराम गाडे शेजारील शेतात नांगर हाकत होते. त्यांनी आरडाओरड केली, पण बिबट्याच्या तोंडातून श्रुतिकाला सोडविता आले नाही. गाडेपट्टी येथील शेतकरी अंकुश कडूसकर यांच्या मुलीची मुलगी श्रुतिका राजेेंद्र थिटे ही मूळची जउळके (ता. खेड) येथील होती. ती आजी कुसूमकडे राहात होती.
मागील महिन्यात भरदुपारी उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर येऊन सुबान गाडे यांची शेळी त्यांच्या डोळ्यांसमोर घेऊन गेला होता. उसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर येत होता. मागील काही दिवस या परिसरात एक मादी व बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. वन विभागाकडे वारंवार मागणी करूनही पिंजरा लावण्यात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या परिसरात ऊसतोडणी वेगाने सुरू असून, उसाच्या शेतात लपलेले बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनरक्षक राजेंद्र गाढवे, वनमजूर सोपान वाळुंज यांनी केले आहे.
दरम्यान, बिबट्याने भरदुपारी हल्ला केल्याची माहिती शाळेतील मुलांना समजली. मुले भयभीत झाली असून, बिबट्याची चर्चा जोरात सुरू आहे.भक्ष्य शोधण्यासाठी सैरभैर झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी बोर्डचे सदस्य गणपतराव इंदोरे, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर, विश्वहिंदू परिषदेचे उपाध्यक्ष गणेश सदाशिव गाडे यांनी वनक्षेत्र अधिकारी एस. आर. पालवे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group