वाकड (Pclive7.com):- परिसरात दहशत पसरविण्यासाठी एका तरुणाने ‘टिक-टॉक’चा वापर करत ‘वाढीव दिसताय राव’ या लावणीवर एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये त्याने कोयत्या सारखे शस्त्र हातात बाळगले आहे. हा ‘वाढीव’ व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी या तरुणाला ठाण्यात आणून चांगलाच ‘वाढीव प्रसाद’ दिला.
दीपक आबा दाखले (वय २३, रा. रहाटणी) असे पोलिसांकडून ‘वाढीव प्रसाद’ मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक याने ‘टिक टॉक’चा वापर करून ‘वाढीव दिसताय राव’ या लावणीवर एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये दीपक लोखंडी कोयता सारखे शस्त्र घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने बनवला आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागताच पोलिसांनी दिपकला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची ‘वाढीव’ व्हिडिओ बाबतची चौकशी केली. त्यानंतर त्याला पोलिसांनी ‘वाढीव प्रसाद’ देखील दिला. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंदविला. दीपक याच्यावर यापूर्वी देखील मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.






















Join Our Whatsapp Group