पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी देहूरोड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी पोलिस ठाण्यांची हद्द विभाजन करून रावेत, शिरगाव, म्हाळुंगे आणि बावधन या नविन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याअंतर्गत रावेत पोलीस चौकीचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, ज्ञानेश्वर साबळे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका संगीता भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर टीम संकल्पना सुरू करण्यात आली. यामध्ये नागरिकांना सात ते पंधरा मिनिटांमध्ये मदत मिळावी यासाठी पावले उचलली जात आहेत.
रावेत, चाकण, म्हाळुंगे, शिरगाव आणि बावधन परिसरातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी लांबचा पल्ला पार करावे लागत असल्याने या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महासंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर या पोलिस ठाण्याचा कारभार सुरू होणार आहे.
या प्रक्रियेमध्ये काही महिन्यांचा अवधी जाणार असल्याने बावधन वगळता इतर प्रस्तावित पोलीस ठाण्यांचे तात्पुरते चौकी स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. मात्र या पोलीस चौक्यांमध्ये पोलीस ठाण्यात प्रमाणेच कामकाज चालणार आहे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व साधनसामग्री देखील देण्यात आली आहे.