पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. शहरात कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. गल्लोगल्ली कचरा ढिग साचले आहेत. या परस्थितीस कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदारांचा निष्काळजीपणा, आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे कचरा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. गेल्या दहा दिवसापासून कचऱ्यांचा प्रश्न न सुटल्याने नगरसेवक तुषार कामठेंनी मुख्यालयात कचरा ओतून निष्क्रीय आयुक्त श्रावण हर्डिकर, मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनिल राॅय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे यांचा निषेध व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघराचा कचरा उचलणे, कचरा संकलन करुन मोशीत घेवून जाण्याचे आठ वर्षांचे टेंडर काढले होते. शहराची उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करुन देण्यात आली. उत्तर भाग बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड तर, दक्षिण भाग ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना काम देण्यात आले. १ जुलैपासून ठेकेदारांनी प्रत्यक्षात कचरा संकलन व वहनाच्या कामास सुरुवात केले. पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही ठेकेदारांच्या कामाचा कचराच झाला आहे. आठही प्रभागात कचऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदार घरोघरचा कचरा व्यवस्थित संकलित करीत नाहीत. वाहनांची उंची अधिक असल्याने कचरा टाकताना महिलांना अडचणी येत आहेत. तसेच सोसाट्यांमधील कचरा उचलला जात नाही. कचराकुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे.
कचऱ्यांचा प्रश्न गंभीर होवूनही आयुक्त श्रावण हर्डिकर यांना शहराचं काहीच देणं-घेणं नाही. तर मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनिल राॅय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे या दोघांनीही कचरा प्रश्नांवर स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आमच्या काळात टेंडर झालेले नाही. पुर्वीच्याच अधिकाऱ्यांनी केलेले टेंडर आहे, आम्ही केवळ त्याची अमंलबजावणी केलेली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही ठेकेदारांना नोटीस बजावल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी हे अधिकारी समक्ष नाहीत. त्या दोघांवर कारवाई करुन पुन्हा वैद्यकीय विभागात परत पाठवा, तसेच आरोग्य विभागाचा पदभार सक्षम अधिकाऱ्यांना देवून ठेकेदारांचे कडक कारवाईची मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group