पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, आमदार, पदाधिकारी अचानकपणे सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तपास यंत्रणांचा भीती दाखवून, त्रास देऊन विरोधकांना पक्षांतर करण्यास भाग पडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला होता. त्यांनतर आज सोमवारी पिंपरी चौकात भाजपची खिल्ली उडविणारा फलक लावला आहे.
भाजपमध्ये प्रवेश देणे आहे, ईडी व ‘इन्कम टॅक्स’ची नोटिस आलेल्यांना प्राधान्य असेल असा मजकूर फलकावर आहे. दरम्यान, फलक कोणी लावला हे समजू शकले नाही. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हा फलक झळकला आहे. भाजपात प्रवेश देणे आहे. ईडी व ‘इन्कम टॅक्स’ची नोटिस आलेल्यांना प्राधान्य असेल. भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती. सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा. टीप- विचारधारेची कोणतेही अट नाही. आमच्याकडे जागा फुल झाल्यास मित्र शाखेत अडजेस्ट करता येईल, असे फलकावर लिहिले आहे. प्रवेशासाठी फलकावर खाली एक नंबरही दिला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहर भाजपात गेलेले सर्व आमदार, नगरसेवक हे मुळचे राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे या फलकाच्या माध्यमातून भाजपाची खिल्ली उडवत भाजपात गेलेल्या मंडळींवर देखील निशाना साधण्यात आला आहे.