पिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएमएलने पिंपरी चिंचवड शहरावर पुन्हा दुजाभाव केला आहे. पिंपरी चिंचवड व आसपासच्या परिसरातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती शहरातील नागरीकांना आणि पर्यटकांना व्हावी, या उद्देशाने ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बससेवा आज सुरु करण्यात आली आहे. मात्र या ‘पिंपरी चिंचवड दर्शन’साठी धावणाऱ्या बसेस जुन्याच दिल्या आहेत. तर प्रवास खर्चही महागडा असून हि बस सेवा व्यवहार्य ठरणार नाही, असे परखड मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचे तिकीट माणसी पाचशे रुपये ठेवले आहे. परंतु या बससेवेसाठी असणाऱ्या बसेस जीर्ण झालेल्या असून पूर्वी त्या हिंजवडी ते पुणे विमानतळ या सेवेसाठी कार्यरत होत्या. ती सेवा बंद पडल्यामुळे या बसेस पिंपरी चिंचवडसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पुन्हा एकादा पीएमपीएमएलने पिंपरी चिंचवड शहरासाठी दुजाभाव दाखवून दिला आहे. पीएमपीएमएल दैंनदिन पास हा ज्येष्ठासाठी ४० रुपये तर सर्वसामांन्यासाठी ७० रुपये आहे. त्यामुळे ५०० रुपये खर्च करुन किती नागरीक या सेवेचा लाभ घेतील का? याबाबत साशंकताच आहे. यापेक्षा खासगी कॅब सेवा स्वस्तात घेता येते. त्यामुळे या बससेवेचे दर किफायतशीर ठेवणे गरजेचे आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात सध्या कचऱ्याची समस्या भयंकर झाली असून शहरात जागोजागी कचऱ्याच्या ढिगांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ५०० रुपये घेऊन पीएमपीएमएल हे कचऱ्यांचे ढिग दाखविणार आहेत काय? मोठा गाजावाजा करुन पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा करुन शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याची टिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.