पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दादागिरी करून विषय मंजूर करुन घेतले जात आहेत. विरोधी सदस्यांना बोलू न देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. सभा चालविताना सभाशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात येत असून नगरसचिवही कायद्यातील तरतुदी चुकीच्या पद्धतीने वाचत नगरसेवकांची दिशाभूल करीत असल्याचे गंभीर आरोप शिवसेनेचे गटनेते तथा स्थायीचे सदस्य राहुल कलाटे यांनी केला. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अनेक विषयांना बगल देत तसेच मनमानी करत सभागृह चालविल्यामुळे राहुल कलाटे व स्थायीचे सभापती विलास मडिगेरी यांच्यामध्ये खडाजंगी झाली. यानंतर कलाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायीमधील विषयांची माहिती दिली.

राहुल कलाटे म्हणाले, कायद्यातील तरतुदी आणि परंपरा असा नेहमीच सभा चालविताना घोळ घातला जात आहे. गरजेनुसार या दोन्ही विषयांचा वापर केला जात आहे. स्थायीच्या सभेत बोलण्यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना अध्यक्षांची परवानगी बंधनकारक करण्यात आल्यावरून आज सभेत खडाजंगी झाल्याचे ते म्हणाले. मनमानी पद्धतीने उपसूचना देण्यावरून आपण आपला विरोध नोंदविण्याचा प्रयत्न करतानाच या विषयाची माहिती देण्यासाठी आग्रह धरला असता केवळ मत नोंदवा, असे सांगत अध्यक्षांनी विरोधकांचा आवाज दाबल्याचे कलाटे यांनी सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष हे त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून इतरांना ब्लॅकमेलिंग करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. वरिष्ठांच्या इशाऱ्यावर अध्यक्षांनी चालविलेला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उत्तरे देण्यास टाळाटाळ
महापालिकेच्या कामांबाबत तसेच नगरसेवकांना येत असलेल्या अडचणी व जाणीवपूर्वक होत असलेल्या कारवाईबाबत महापालिका आयुक्तांना अनेक पत्रे तसेच स्मरण पत्रे दिल्यानंतर एकाही पत्राबाबत माहिती दिली जात नसल्याबाबत खंत राहुल कलाटे यांनी व्यक्त केली. माहिती दडवून ठेवण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आयुक्तांचा कारभार सुरू असल्याचेही कलाटे म्हणाले.
उशिरा सुचलेले शहाणपण
जोपर्यंत राज्यात भाजपाची सत्ता होती तोपर्यंत रिंगरोडसाठी आग्रही असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी आता नागरिकांची घरे वाचविण्यासाठी रिंगरोड आराखड्यात बदल करण्याची मागणी केली आहे. या गोष्टीचे आपणाला आश्चर्य वाटत असून त्यांना हे उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची टीका कलाटे यांनी यावेळी केली. ते म्हणाले, रिंगरोड स्थलांतरण करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण नागरिकांना न्याय देऊ.






















Join Our Whatsapp Group