पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर माई ढोरे यांनी सभागृह चालवताना सभाशास्त्रांचे नियम पायदळी तुडविले. त्यांनी करयोग्य मुल्य विषयांवर विरोधकांना दमदाटीची भाषा बोलून दाखवत अवघ्या तीन मिनिटांत तब्बल १८ विषय उपसूचनांसह गोंधळाच्या वातावरणात मंजूर केले. दरम्यान विरोधकांना दमदाटी करत बोलून न दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी टेबलवरील ग्लास खाली आपटून फोडत महापौरांचा निषेध नोंदविला. तर कलाटे यांनी महापौरांचा अवमान केला असल्याचा कांगावा करत सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकांनी कलाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची २० फेब्रुवारीची तहकूब महासभा आज (दि.२६) पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर माई ढोरे होत्या. सत्ताधारी भाजपकडून महापालिका हद्दीतील जून्या मिळकतींना ‘कर योग्य मूल्य’ लागू करण्यात आला. त्यावर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना महापाैरांनी बोलण्यास मज्जाव केला. त्यावरुन सभागृहात एकच गोंधळ उडाला.
शहरातील जून्या इमारतींना १ एप्रिल २०२० पासून कर योग्य मूल्य लागू करण्यात येणार आहे. हा विषय सत्ताधारी भाजपकडून मंजूर करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह भाजपच्या काही नगरसेवकांनी करवाढ लागू करण्यास विरोध दर्शविला. मात्र, भाजपकडून हा प्रस्ताव फेटाळला अथवा दप्तरी दाखल केला असता, तरीही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या अधिकारात त्यांनी १ एप्रिलला करवाढ लागू करणार असल्याचे सभेत स्पष्ट केले.
या प्रस्तावावर बोलण्यास शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापाैरांकडे मागणी केली. पण त्यांना बोलण्यास न देताच महापाैरांनी दुसऱ्या विषयास सुरुवात केली. त्यावेळी राहुल कलाटे यांनी महापाैर.. तुम्ही दादागिरी करत आहात. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच हातातील ग्लास जमिनीवर आदळत महापाैरांचा निषेध व्यक्त केला. याचाच फायदा उचलत सत्ताधारी भाजपाने गोंधळाच्या वातावरणातच सभा रेटून चालवली. महापाैरांनी तीन मिनिटांत तब्बल १८ विषय उपसूचनांसह मंजूर केले.






















Join Our Whatsapp Group