पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील मेट्रो स्थानक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने देशभरात ओळखले जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने या महत्त्वपूर्ण विषयाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला.
१७ व्या शतकात एका महिलेने इंदूरमधील माळवा या आपल्या साम्राज्याच्या बाहेर देशभरात केलेले धार्मिक विकास कार्य, न्यायदानाची बजावलेली भूमिका, आणि शोषित व वंचितांसाठी केलेल्या कार्य इतिहासात अजरामर आहे. जनतेच्या ह्दयातील “देवी” असे स्थान निर्माण केलेल्या अहिल्याबाई होळकर यांचे नाव पिंपरीतील मेट्रो स्थानकाला आता लवकरच दिले जाणार आहे. माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी यासाठी समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश मिळाले आहे.
पिंपरी ते स्वारगेट या प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. पिंपरीतील मुख्य चौकात अहिल्यादेवींचा पुतळा आहे. मेट्रोच्या कामामुळे हा पुतळा तांत्रिक कारणास्तव मागे घ्यावा लागत होता.मागील वर्षी तत्कालीन महापौर राहुल जाधव यांनी याप्रश्नी कुठलीही तडजोड न स्विकारता पुतळा मागे घेतल्यानंतर अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणे व स्थानकाला त्यांचे नाव देणे यासाठी आग्रही भूमिका मेट्रो प्रशासनापुढे घेतली होती. राजू दुर्गे हे त्यासाठी विशेष आग्रही होते. मागील महिन्यातच झालेल्या स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण सभेची त्यास अंतिम मंजूरी मिळणे गरजेचे होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या सभेमध्ये महापौर उषा ढोरे यांनी हा विषय सभागृहात मंजूर करून घेत देशभरातील कोट्यावधी धनगर बांधवांना फार मोठी भेट दिल्याचे मानले जात आहे.