पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांना संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयासह महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा पदभार देण्यात यावा अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.
यासंदर्भात संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१४ मार्च २०२० रोजी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांना वायसीएम रूग्णालयासह वैद्यकीय विभागाचा पदभार देण्यात यावा अशी विनंती आयुक्तांकडे ई मेलव्दारे केली होती. परंतू प्रशासनाला याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. माहे फेब्रुवारी २०१९ पर्यंत वैद्यकीय विभागाचा पदभार डॉ.अनिल रॉय यांच्याकडे होता. तसेच त्यापूर्वी वायसीएम रुग्णालयसुध्दा त्यांचे अखत्यारित होते. त्यावेळी वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व दवाखान्यांची व रुग्णालयांची जबाबदारी ही एकाच अधिकाऱ्याकडे असल्यामुळे सर्व रुग्णालयांमधील रुग्णांना योग्य उपचार पुरविण्यात येत होते. परंतु वायसीएम रुग्णालयामध्ये मानधनाचा अधिकारी नेमण्यात आल्यानंतर आरोग्य सुविधेवर त्याचा परिणाम झालेला आहे. तसेच रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे मध्यंतरी दिसून आले आहे.
सध्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत वायसीएम रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचार देणे आवश्यक असताना मानधनाच्या डॉक्टरांचा बचाव करण्यासाठी आयसोलेशन सेंटर भोसरी रुग्णालयात स्थापन केलेले आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी असलेली यंत्रणा एकाच अधिकाऱ्याकडे नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाची संपूर्ण जबाबदारी वायसीएम रुग्णालयासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय यांच्याकडे तातडीने सोपवावी अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group