पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज (दि.०१) दिवसभरात (सायं.७.३० वाजेपर्यंत) एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी शुक्रवारी खंडीत झाली आहे. पिंपरी चिंचवडसाठी ही दिलासादायक बाब आहे.
शहरातील कोरोना संशयित रुग्णांच्या घशातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. शुक्रवारी दिवसभरात २२६ संशयित रुग्णांच्या नमुने तपासण्यात आले. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी शुक्रवारी खंडीत झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात कोरोनाबाधितांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण कसे मिळवावे, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली होती. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळलेला परिसर तातडीने सील करून त्या भागात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या कंटेनमेंट पॅटर्नमुळेच शुक्रवारी कोरोना रुग्ण आढळण्याची साखळी खंडीत झाली आहे.
दरम्यान आतापर्यंत शहरातील ११३ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यातील ४५ रुग्ण उचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आणि भोसरी रुग्णालयात एकूण ६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता आणखी ७७ जणांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.