पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आता महापालिकेबरोबर खासगी संस्थांकडूनही कोरोनाची टेस्ट करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसचिव उल्हास जगताप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार खासगी संस्थांमार्फत नमुने तपासणीची गरज आयुक्तांनी व्यक्त केली. चाचण्या वाढविल्यास कोरोनाची आकडेवारी कमी होण्यास मदत होईल आणि वेळेतही बचत होईल, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर सर्वपक्षीय गटनेत्यांनी आयुक्तांच्या या सूचनेला पाठिंबा दिला आणि खासगी संस्थांमार्फत कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिली.
या बैठकीत महापालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा घेण्याबाबत चर्चा झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून सभा तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेची अजून मान्यता मिळालेली नाही. ती मान्यता घेण्यासाठी महापालिकेची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार येत्या १ जून रोजी सभा घेण्याबाबत चर्चा झाली.























Join Our Whatsapp Group