पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २० महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. येथील क्वारंटाईन नागरिकांसाठी midc महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवासेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.
या संदर्भात जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २० महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी वसाहत आहे. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी किमान दोन हजार घरे व अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या आहे. सध्या कोविड-१९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व तो परी प्रयत्न सुरु आहे. परंतु दाट लोकवस्ती मध्ये कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून त्या परिसरामध्ये योग्य उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे वाटते. शहरातील मोठ्या दाट लोकवस्ती पैकी महात्मा फुलेनगर झोपडपट्टी आहे. या ठिकाणी एक रुग्ण पॉजिटिव्ह रुग्ण सापडले . परंतु पुढील संभाव्य धोका लक्षात घेता परिसरामधील क्वारंटाइन नागरिकांना midc महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.
महात्मा फुलेनगर झोपडपट्टी व लांडेवाडी मध्ये ५० टक्के कुटुंबातील सदस्य सार्वजनिक शौचालयचा वापर करतात. या ठिकाणी अत्यंत छोटे – छोटे गल्ल्या आहेत. मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांचा सहज संपर्क होवून कोरोना आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सध्या महात्मा फुलेनगर मध्ये पंचवीस संशयित नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. परंतु १४ दिवस घरी राहणे बंधनकारक असतांना हे नागरिक अत्यंत बेपार्वाहीने समाजामध्ये वावरतांना दिसून येत आहेत. क्वारंटाईन नागरिकांना वारंवार सांगूनही कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता बिन्दास्त पणे फिरतांना दिसतात. त्यामुळे येथील परिस्थितीचा योग्य आढावा घेवून महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये क्वारंटाईन नागरिकांना जागा उपलब्ध करून दिल्यास आनंदनगर झोपडपट्टी सारखी परिस्थिती उद्भवणार नाही. तरी वरील विषय अत्यंत गांभीर्याने लक्षात घेवून लवकरात लवकर महात्मा फुलेनगर व लांडेवाडी मधील क्वारंटाईन नागरिकांना midc महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group