पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या नाश्त्यामध्ये केस, आळ्या सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. शासनाच्या सक्षम अधिकार्यामार्फत याठिकाणावर पाहणी करून योग्य त्या उपाययोजना त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याविषयी बोलताना वाघेरे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच ठिकाणी वाढत आहे. दाट वस्तीतील नागरिकांना अनेक शासकीय जागेमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये महापालिकेच्या वतीने दाखल करण्यात येत आहे. यासर्व नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचे काम सर्वस्वी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आहे. परंतु यासर्व क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक माध्यमांनी देखील याची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केलेली आहे. ज्या नागरिकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलेले आहे. यातील बहुतांश नागरिक शहरातील रहिवाशी आहेत. जर त्यांच्या बरोबरच अश्या घटना घडत असतील तर बाहेरील नागरिकांचे काय? असा सवाल नागरिक करीत असून सदर प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नाहक बदनामी होत आहे.
महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे अश्या प्रकारची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. अश्या प्रकारचा सज्जड दम शासनामार्फत आयुक्तांना देणे गरजेचे झालेले आहे.
शहरातील गोरगरीब जनता महापालिकेकडे या संकटाच्या काळामध्ये मोठ्या आशेने पाहत आहे. त्यांना मदत करणे तर सोडाच पण त्यांच्या नाष्ट्याच्या पदार्थामध्ये केस व आळया सापडत आहेत. आपले अधिकारी काय झोपा काढत आहेत का? ज्या नागरिकांनी दिलेल्या कररूपी पैशातून आपले पगार निघत आहेत याची जाणीव आपल्या अधिकार्यांना राहिलेली दिसून येत नाही. शहरातील चार-पाच विकासकामे नाही झाली तरी चालतील परंतु संकटाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेचे असे हाल होऊ देऊ नका. क्वारंटाईन सेंटरची शासनाच्या सक्षम अधिकार्यामार्फत पाहणी करून योग्य त्या उपाययोजना त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच सदर प्रकरणात महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जबाबदार धरून योग्य ती कारवाई करावी. क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधा तत्काळ पुरविण्याचे आदेश त्वरित देण्यात यावेत अशी मागणी देखील वाघेरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group