पिंपरी (Pclive7.com):- देशभर लॉकडाऊन सुरु असल्यामुळे बहुतांशी नागरिकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे नोकरदारांचे वेतन बंद आहे. शैक्षणिक वर्ष 2020 – 21 साठी शाळा महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासनाचे अद्याप धोरण ठरलेले नाही. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शालेय फी व शुल्कवाढ बाबत काढलेल्या आदेशाकडे शालेय संस्था चालक दुर्लक्ष करुन पालकांना शैक्षणिक शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करत आहेत. अशा संस्थांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे. तसे पत्र वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी आणि शिक्षण उप संचालक पुणे यांना दिले आहे.
या पत्रात वाकडकर यांनी म्हटले आहे की, पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत पालक हवालदिल झाले आहेत. शहरातील अनेक शिक्षण संस्थाकडून पालकांना एसएमएस, फोन, ई-मेल, व्हाट्सअप द्वारे फी भरण्याबाबत पाठपुरावा केला जात आहे. ‘महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये सन-2020-21 वर्षाकरीता शूल्कवाढ न करणेबाबत’ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 8 मे 2020 रोजी साथ रोग अधिनियम – 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चा संदर्भ देऊन शैक्षणिक संस्थांनी पालकांकडे शालेय फी व शुल्कवाढ जमा करण्याबाबत सक्ती करु नये असे आदेश काढले आहेत. या आदेशाची सर्व शिक्षण संस्थांनी व संस्था चालकांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी. अन्यथा पालकांना फी जमा करण्याबाबत सक्ती करणा-या, दबाव आणणा-या संस्था चालकांविरुध्द राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशाराही वाकडकर यांनी पत्रात दिला आहे.























Join Our Whatsapp Group