पुणे (Pclive7.com):- पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी लवासामधील जागा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. परंतु यादरम्यान गिरीश बापट यांनी लवासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले असून कोविड केअर सेंटरसाठी लवासाच्या जागेचा वापर करण्याचेही सूचवले आहे. यापूर्वी मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोविड केअर सेंटर तातडीने उभारण्यात यावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली होती. त्यासंबंधीचे निवेदन मारणे यांनी गिरीश बापट यांच्याकडे दिले होते. त्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवले होते. मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढत असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नसल्याने त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मागणी करण्यात आली.
लवासामधील जागा सध्या रिक्त आहे आणि कोरोनाविरोधातील लढ्यात या जागेचा वापर करता येऊ शकतो. शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि अन्य मालमत्ता आपण ताब्यात घ्याव्यात अशी मी विनंती करत आहे. रुग्णांसाठी बेड्स आणि कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आपण याठिकाणी निर्माण करू शकतो, असे बापट यांनी पत्रात नमूद केले आहे.
लवासामध्ये अनेक इमारतींसोबतच सुविधांनी परिपूर्ण असे एक रुग्णालयदेखील आहे. फारच कमी लोक त्या ठिकाणी राहत आहेत. कोरोनाबाधितांना क्वारंटाइन करण्यासाठी ती जागा चांगली ठरू शकते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसेच ज्या प्रमाणे त्याठिकाणी रुग्णालय उपलब्ध आहे त्यामुळे पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. मुळशीतील कोरोनाबाधित रुग्णांवर त्याठिकाणी उपचार केले जाऊ शततात, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. परंतु, या जागेचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या प्रस्तावाचा निषेध करण्यात येत असल्याचंही त्यांनी कबूल केले.
त्याचे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर झाल्यास आपल्याला कोरोना विषाणूची बाधा होईल आणि शहरात त्याचा प्रसार होईल अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. परंतु आम्ही रिक्त असलेल्या मोठ्या जागांबाबत बोलत आहोत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचीही भीती कमी आहे. आम्ही केवळ अशा प्रकारच्या तयार पायाभूत सुविधांचा वापर करू इच्छितो, असा आग्रह बापट यांनी पत्रात धरला आहे.




















Join Our Whatsapp Group