पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आज (दि.७) नगरसचिवांकडे जमा करण्यात आला. गटनेतेपदी राजू मिसाळ यांची निवड झाल्याची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. सध्या ३४ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असल्याने मिसाळ नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महापौर माई ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील.
पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल, दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने, तिस-यावर्षी चिंचवडमधील पिंपळे सौदागरचे प्रतिनिधीत्व करणारे नाना काटे यांच्याकडे पद देण्यात आले होते.
एक वर्षाचा कालावधी संपल्याने नाना काटे यांनी २ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यात रस्सीखेच होती. त्यात राजू मिसाळ यांनी बाजी मारली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता चौथ्यावर्षी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली आहे. मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. स्थायी समितीचे दोन वर्षे सदस्य देखील ते होते.























Join Our Whatsapp Group