पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची औषधे तसेच इंजेक्शन यांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर येत आहे. म्हणूनच या विरोधात विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी एक मोहिम हाती घेतली आहे. शहरात कोठेही अशा प्रकारचा काळाबाजार होत असल्यास त्याची तक्रार महापालिकेतील विरोधी पक्षनेता कार्यालय तसेच पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय येथे तक्रार करावी असे आवाहन राजू मिसाळ यांनी केले आहे.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गावर नियत्रंण आणण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. शहरातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. त्याच प्रमाणे राज्य शासनाकडूनही आवश्यक ती मदत मिळत आहे. तसेच जंम्बो हॉस्पिटल नेहरुनगर व अँटो क्लस्टर येथे उभारण्यात आले आहे. एकुण शहरातील सरकारी व खाजगी वैद्यकीय यंत्रणा यासाठी काम करीत आहे.
परंतु महापालिकेच्या काही रुग्णांलयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन हे बाहेरुन आणावे लागत असल्याबाबतच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये शहरातील सर्व सामान्य अगोदरच धास्तावलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडून महागडी औषधे व इंजेक्शन बाहेरून मागविल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक योग्य नाही.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना विनंती करतो की, महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांस बाहेरून औषधे किंवा इंजेक्शन आणण्यास सांगितल्यास त्याबाबत विरोधी पक्षनेता कार्यालयात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टी कार्यालयात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नगरसदस्याकडे व शहरातील कोणत्याही राष्ट्रवादी पदाधिका-यांकडे लेखी स्वरुपात तक्रारी देण्यात याव्यात. म्हणजे त्यांची योग्य दखल घेण्यात येऊन औषधांचा व इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या कोणत्याही दर्जांच्या हॉस्पिटल, मेडीकल व डॉक्टर यांची गय केली जाणार नाही.
शहरामध्ये अनेक लोक कोरोना योध्दे म्हणून काम व कर्तव्य करीत असून त्यांना आमचा मनापासून धन्यवाद आहे. परंतु काही काळाबाजार करणा-या व्यक्तींमुळे या योध्द्यांची सुध्दा बदनामी होते. ती सुध्दा खपवून घेतली जाणार नाही, त्यामुळे असा काळाबाजार करणा-यांना राजू मिसाळ यांनी हा इशारा दिला आहे.






















Join Our Whatsapp Group