पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखाने सुरू करण्याची परवानगी देताना प्रशासनाने नियमावलीदेखील जाहीर केली. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे कारखान्यांकडून उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे अनेक कामगारांना कोरोनाची लागण झाली असून काहींना जीव गमवावा लागला आहे. काही कारखान्यांनी कोरोनाचा गैरफायदा घेऊन कामगारांना कामावरून काढून टाकले, तर काहींनी वेतनकपात केली आहे. कंपन्यांनी नियमांची अंमलबजावणी न केल्याने कामगार मृत्यूच्या दाढेत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनामुळे स्वतःच्या जिवाला घाबरून घरात बसून राज्याचा कारभार करत आहेत. कामगारांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. यशवंत भोसले म्हणाले, की सरकारमार्फत जी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करण्यात आली होती ती कारखान्यांनी पाळली नाही. नियमावलीचे पालन केले आहे का नाही? हे पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे.
कारखान्यामध्ये ज्या कामगारांना कोरोनाची बाधा झाली त्या कामगारांचा काम करत असलेला विभाग १० दिवस बंद ठेवून त्यांच्या संपर्कात आलेल्या कामगारांची कोरोना टेस्ट करून त्यांना विलगीकरण करण्याची खबरदारी कारखान्यांनी घेतलेली नाही. काही अपवाद वगळता इतर कारखान्यांमध्ये कामगारांना ने – आण करणाऱ्या वाहतुकी दरम्यान देखील सामाजिक अंतर पाळल्याचे दिसून येत नाही. कारखान्यांमध्ये लॉकर व चेंजिंग रूम एकत्रच असल्यामुळे संसर्गाची लागण होण्याची शक्यता वाढते.
अनेक कारखान्यांमध्ये कामगारांनी कोरोनापासून सुरक्षेसाठी कंपनीला काही सूचना केल्या. मात्र, त्या कामगारांना कामावर येण्यास कंपनीने मनाई केली. तसेच, त्यांचा जबरदस्तीने राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर कंत्राटी कामगार भरले आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, ज्या कामगारांची वेतनकपात केली आहे त्या कामगारांचे वेतन फरकासह द्यावे, अशी मागणी भोसले यांनी केली.
कामगारमंत्री दिलीप वळसे – पाटील यांना याबाबत वारंवार संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे यशवंत भोसले म्हणाले.






















Join Our Whatsapp Group